ब्रेकिंग न्यूज

तरुणीचे अपहरण करून सेक्स रॅकेटसाठी वापर, ३७ वर्षीय आरोपीला अटक

Share

पिंपरी – डेटिंग एप वरून ओळख झालेल्या तरुणीची फसवणूक करून तिचा वापर सेक्स रॅकेटसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किवळे येथील लोढा बेलमोंडो या उच्चभ्रू सोसायटीत एक महिन्यापासून हा प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. सुरु होता प्रकारसोसायटी मध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील १९ वर्षीय तरुणी २०२५ मध्ये दिल्ली येथील एका खासगी संस्थेत आर्किटेक्चरच्या शिक्षणासाठी गेली होती. पहिल्या वर्षात ती काही विषयांमध्ये नापास झाली. ती सुट्टीसाठी घरी आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला दिल्लीला पुन्हा पाठवण्यास नकार दिला. मात्र तरुणीने दिल्लीला जाण्याचा हट्ट धरला.

दरम्यान, डेटिंग ऍप वरून तिची ३७ वर्षीय आरोपी व्यक्तीसोबत ओळख झाली. त्या व्यक्तीने तरुणीला दिल्ली येथे शिक्षणाला जाण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ११ जुलै २०२६ रोजी तिला पिंपरी मधून कारमधून आरोपी घेऊन गेला. तरुणी घरातून बेपत्ता झाल्याबाबत तिच्या कुटुंबीयांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तरुणीला घेऊन गेल्यानंतर आरोपीने तिच्याकडून तिचे सर्व ओरिजनल डॉक्युमेंट घेतले. तिचा फोटो घेतला. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे लगत असलेल्या किवळे येथील लोढा बेलमोंडो या उच्चभ्रू सोसायटीत नेले. तिथे एका फ्लॅटमध्ये आरोपीने तरुणीला ठेवले. तिची कागदपत्रे आपल्याकडे असून ती पाहिजे असल्यास तसेच दिल्ली येथे जायचे असल्यास शरीरसंबंध ठेवण्याची मागणी करत तिच्यासोबत अनेक वेळेला शारीरिक संबंध ठेवले.

तसेच डेटिंग एप्लीकेशनवर या तरुणीचे ‘रोझी’ नावाने प्रोफाइल तयार करून आरोपीने तरुणीला ग्राहकाकडे शरीरसंबंध ठेवण्यासाठी मुंबई येथे दोन वेळा आणि अहमदाबाद येथे एक वेळेला पाठवले. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर तरुणीने घरी जाण्याची मागणी केली. आरोपीने तरुणीला दोन दिवसांपूर्वी पिंपरी येथील टेल्को कंपनीजवळ सोडून तो पसार झाला. घरी पोहोचल्यावर तरुणीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रसंग घरच्यांना सांगितला.

तिच्या कुटुंबीयांनी तातडीने शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरण, सामूहिक अत्याचार आणि अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी ३७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.