ब्रेकिंग न्यूज

अवैध विक्रीसाठी ठेवलेला मद्यसाठा जप्त, पुण्यातील सुर्वेज ढाब्यावर छापा 

Share

अवैध विक्रीसाठी ठेवलेला मद्यसाठा जप्त, पुण्यातील सुर्वेज ढाब्यावर छापा

पुणे – पुण्यातील सुप्रसिद्ध सुर्वेज ढाब्यावर बाणेर पोलिसांनी कारवाई करून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप असलेला मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी पुण्यातील मालक आणि मॅनेजरला अटक केली आहे.

मॅनेजर गोपाल निचळ (वय ४५, रा. भुगाव, पुणे)आणि हॉटेल मालक कुणाल सुधाकर गायकवाड (वय ३९, रा. पिंपळे गुरव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत सुमारे ६१ हजार २२० रुपये किमतीची दारू आणि बिअर जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप यांना खबऱ्याकडून सुतारवाडी-पाषाण येथील सुर्वेज ढाब्यात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.

ही माहितीची खातरजमा केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सानप आणि त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. हॉटेलच्या आतील भागात दारू आणि बिअरच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. या कारवाईत एकूण ६१,२२० रुपयांचा कथित अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त चुलूमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खिल्लारे, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तसेच पोलीस अंमलदार सौरभ पाटील आणि गणेश मुंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.