ब्रेकिंग न्यूज

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार तीन दिवसीय पिंपरी-चिंचवड महोत्सव

Share

पिंपरी- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा तीन दिवसीय महोत्सव पार पडणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देणे, स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शहराच्या कला-साहित्य परंपरेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा तीन दिवसीय महोत्सव पार पडणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.

पत्रकार परिषदेत महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महोत्सवाचे स्वरूप आणि नियोजित उपक्रमांची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देणे, स्थानिक कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शहराच्या कला-साहित्य परंपरेचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले. औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रासोबतच पिंपरी-चिंचवडची सांस्कृतिक ओळख अधिक दृढ करणे आणि सामाजिक एकोपा वाढवणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.

या महोत्सवात सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रिय व्यावसायिक मराठी नाटके, तसेच भावगीत, नाट्यगीत, भक्तिगीत आणि हिंदी-मराठी गीतांची संगीत मैफल होणार आहे. पारंपरिक लावणीचे सादरीकरण, तरुणाईसाठी रॉक बँड परफॉर्मन्स आणि राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित केले जाईल.
या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी पाककला स्पर्धा, फॅशन शो, लहान मुलांसाठी बालनाट्य स्पर्धा, तसेच लाठी-काठी व दांडपट्ट्याची मर्दानी प्रात्यक्षिके सादर केली जातील. हस्तकला, पारंपरिक वस्तू आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शहरातील गुणवंतांचा महोत्सवादरम्यान ‘कलारत्न’, ‘साहित्यरत्न’, ‘क्रीडारत्न’, ‘नृत्यरत्न’ आणि ‘संगीतरत्न’ या विशेष पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवात नागरिकांनी, कलाप्रेमींनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.