बारामती – बेकायदेशीर शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या टोळक्याविरुद्ध कारवाई करताना एका सराईत आरोपीला गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह बारामती पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्रदीप सुरेश नकाते (वय 27, रा. महात्मा फुलेनगर, आमराई, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मात्र अजय नंदकुमार सकट, रोहित अशोक सोनवणे आणि गणेश पाठक पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 ऑगस्ट रोजी पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना नकाते हा कमरेला पिस्तूल घेऊन काही साथीदारांसह फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्याच्या साथीदारांकडेही घातक हत्यारे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास पथकाने माहितीची खातरजमा करून सापळा रचला.
पोलिसांच्या पथकाने संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवत त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्या कमरेला खोचलेले देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आढळून आले. पिस्तुलासोबत दोन जिवंत काडतुसेही मिळाली. पोलिसांनी सुमारे 25 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते एकत्रित का फिरत होते? आणि कोणत्याही गंभीर गुन्ह्याची तयारी सुरू होती का? याचा तपास केला जात आहे.
