पुणे- निळ्या रंगाच्या ज्युपिटर गाडीवरुन येऊन बारामती शहर व परिसरातील बुलेट चोरुन नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. तसेच हा राज्य राखीव पोलीस दलाच्या टेक्निकल विंगमधील पळून आलेला जवान असल्याचे निष्पन्न झाले आहे.
समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीही फलटण, बारामती, शिरुर परिसरात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
बारामती शहर तसेच तालुका परिसरातून बुलेट चोरीच्या घटना वाढलेल्या दिसून आल्या होत्या. त्यावरुन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या. बुलेट चोरीला गेलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एका निळ्या रंगाच्या जुपिटरवरुन चोरटा येतो व बुलेट चोरुन नेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शोध सुरु केला. गस्त घालणार्या पोलिसांना एक संशयित चोरीची मोटारसायकल घेऊन पेन्सिल चौकाकडून मेडिकल कॉलेजकडे जाताना दिसला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने रात्रीच्या वेळी बुलेट चोरुन नेत असल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या वाहनांवर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा, एस टी महामंडळ असे लोगो लावून चोरी केलेल्या मोटारसायकलचा वापर करुन पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याची कबुली दिली.
त्याने फलटणमधील एका गोदामात लपवुन ठेवलेल्या १९ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. त्यात १३ बुलेटचा समावेश आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे, बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अभिजित एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे, विठ्ठल तरंगे यांनी केली आहे.
