ब्रेकिंग न्यूज

मिसिंग लिंकच्या चारही बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर आणि आतील भागात ओव्हरस्पीड कॅमेरे बसणार

Share

पुणे- मुंबई द्रुतगती ( Pune-Mumbai Missing Link ) मार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन रोखण्यासाठी या मार्गावरील चारही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक ओव्हरस्पीड कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अवजड वाहनांच्या बेकायदा प्रवेशावरही महामार्ग पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.

‘मिसिंग लिंक’मुळे या मार्गावर वाहनांचा वेग लक्षणीय वाढल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात तुषार भुमकर यांचा मृत्यू झाल्यानंतर एमएसआरडीसी आणि महामार्ग पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने चारही बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर आणि आतील भागात ओव्हरस्पीड कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक-दोन दिवसांत हे कॅमेरे कार्यान्वित होणार असून, वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची स्वयंचलित नोंद होऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे ‘मिसिंग लिंक’ मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही अनेक ट्रक आणि टेम्पो नियमांचे उल्लंघन करून या मार्गाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी बोगद्याच्या सुमारे दोन किलोमीटर आधीपासूनच अवजड वाहनांना रोखण्यासाठी विशेष बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.