पुणे- जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर गोळीबार करून त्याच्या गळ्यातील ११ लाख रुपये किमतीच्या २२ तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या चोरणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी इंदूर (मध्य प्रदेश) येथून अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट-सात आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
अविनाश क्रिशनचंद्र त्रिपाठी, (वय ४३, रा. बकोरीगाव, हवेली, पुणे मूळ उत्तर प्रदेश), सुरेंद्रपाल रामचंद्र पाल, (वय ३२, रा. बाराबंकी, उत्तर प्रदेश), मोहम्मद शोएब वसीम खान, (वय ३७, रा. बाराबंकी, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेत संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५० रा. गावडेवाडी – शिरसवाडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेची पार्श्वभूमी अशी..
संतोष गावडे हे आपले कार्यालय बंद करून मर्सिडीज कारने घरी चालले असताना रस्त्यात एका व्यक्तीने दुचाकी बंद पडल्याचा बहाणा करून त्यांची कार अडवली. त्याचवेळी इतर दोघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी कारला घेरले. एका हल्लेखोराने थेट कारच्या दिशेने गोळीबार केला. गोळी कारची काच फोडून संतोष गावडे यांच्या चेहऱ्याला लागली. ते जखमी झाल्यानंतर आरोपींनी त्यांच्या गळ्यातील २२ तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या बळजबरीने हिसकावून नेल्या आणि दुचाकीवरून पळ काढला.
आरोपींचा असा शोध घेतला
घटनास्थळावर मिळालेल्या मोटारसायकलच्या आधारे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार साळवे, ढोणे, पलांडे, संदीप येळे, विनायक येवले यांनी अवघ्या ४-५ तासात आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर त्यांचा मागोवा घेत २४ तासाच्या आत इंदूर येथून अटक केली.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
मुख्य आरोपी अविनाश त्रिपाठी हा भारत आणि नेपाळमध्ये अनेक मोठे दरोडे टाकल्याप्रकरणी वाँटेड असून त्याच्या अटकेसाठी ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध उत्तरप्रदेशात खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोडा असे २० गुन्हे दाखल आहेत. २०१८ मध्ये उत्तर प्रदेश STF ने चकमकीनंतर त्याला लखनौ येथे अटक केली होती. सुरेंद्रपाल पाल याच्याविरुद्ध १२ ते १३ चोरी/लुटीचे गुन्हे तर शोएब खान याच्याविरुद्ध ५ गुन्हे उत्तरप्रदेशात दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक आणि शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, राम राजमाने, वाहिद पठाण, दिपक लगड, कांचन जाधव, सहा. पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, श्रीकांत चव्हाण, मदन कांबळे आणि युनिट-७ व दरोडा पथक-०२ च्या पथकाने केली.
