पुणे- चारित्र्यावर संशय घेऊन एका गरोदर विवाहितेला तिच्या पतीने आणि सासूने चक्क ‘डेटॉल’ पिण्यास भाग पाडलं आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाची तत्परतेनं दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अमानुष प्रकारामुळे शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
एका 22 वर्षीय पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काळेपडळपोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही कालावधीतच पीडितेच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली होती. या निराधार संशयातून त्याने तिला सातत्यानं अमानुष मारहाण केली तसेच तिचा अतोनात मानसिक व शारीरिक छळ केला. पतीच्या मानतील संशय इतका टोकाला गेला की, त्याने छळ करताना पत्नीच्या वेदनांची पर्वादेखील केली नाही.
पीडिता गरोदर असताना गरोदरपणाच्या काळात सासरच्या मंडळींनी अमानुषपणे संगनमत करून आणि बळजबरी करून या महिलेला ‘डेटॉल’ पिण्यास भाग पाडले. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आणि पीडितेच्या जबाबावरून पुणे पोलिसांनी तातडीनं पती प्रतीक पिंगळे (वय 27) सासू वंदना सुनील पिंगळे (वय 45, दोघेही मूळ रहिवासी अक्कलकोट) या आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या काळेपडळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सुसंस्कृत असलेल्या पुण्यात घडलेल्या या भयानक प्रकारामुळे समाजाच्या सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
