पुणे – व्हाट्सअँप किंवा मेसेजद्वारे अनोळखी मेसेज आला तर तो उघडू नका असे वारंवार सांगून देखील अनेकांच्या हातून अशी चूक घडते. पुण्यात एका महिलेने अशी चूक केली आणि क्षणार्धात तिचे बँक खाते पूर्णपणे साफ झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, देवाची उरुळी येथील तक्रारदार महिला २८ जुलै रोजी व्हॉट्सॲप वापरत होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून ‘आरटीओ ई-चलन ॲप’ची एपीके फाइल आली. आपले आरटीओ चलन बाकी आहे की काय, या शंकेने त्यांनी ती फाइल उघडली. परंतु, ही फाइल आरटीओची नसून सायबर भामट्यांचं जाळं होतं. फाइल उघडताच सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलचा रिमोट अॅक्सेस मिळवला आणि त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ७९ हजार २९७ रुपयांचे अनधिकृत व्यवहार करून रक्कम परस्पर लांबवली.
त्यामुळे या घटना टाळण्यासाठी व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवर आरटीओ, बँक, पीएम किसान किंवा वीज बिलाच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही .apk फाईल्स उघडू नका. नेहमी ‘Google Play Store’ किंवा ‘Apple App Store’ वरूनच ॲप्स डाउनलोड करा.
