ब्रेकिंग न्यूज

परवानगी शिवाय सराव नाही… ढोल-ताशा पथकासाठी महापालिका नियमावली करणार

Share

पुणे- पुणे शहरातील गणेशोत्सवाच्या तयारीला हळू हळू रंग येत आहे. या उत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे ढोल ताशा पथक. परंतु या पथकाच्या सरावामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुणे महापालिका ढोल-ताशा पथकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याच्या तयारीत आहे. या नियमावलीनुसारच पथकांना सराव करता येईल.

पुणे शहरातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे. ढोल-ताशांसह लेझीम, टिपरी, झांजा आणि शंखनाद पथकांचे सादरीकरण हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. सध्या पुणे शहरात ठिकठिकाणी ढोल ताशा वादनाचा सराव होता दिसून येत आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढल्याचे दिसून येत असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारीमुळे आता पुणे महानगरपालिका ढोल-ताशा पथकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याच्या विचारात आहे.

यासाठी महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन, शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या उपायुक्तांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे नियमावली तयार करण्यात येणार असून, महापालिकेच्या मालकीच्या जागांचा वापर करण्यासाठी ठरावीक प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. ढोल-ताशा पथकांनी सराव करताना कोणत्या ठिकाणी सराव करावा, कोणाची पूर्वपरवानगी घ्यावी, कोणत्या वेळेत आणि किती वेळ सराव करावा, याबाबत स्पष्ट नियम तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.

काही ढोल-ताशा पथके राजकीय पाठबळाच्या जोरावर विनापरवानगी सराव करत असल्याचे प्रकारही समोर आल्याने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही नियमावली महत्त्वाची ठरणार आहे.