ब्रेकिंग न्यूज

मध्यरात्री बुलेटच्या फटाका आवाजाने दहशत, चौघांच्या विरोधात गुन्हा, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई

Share

पुणे- पुण्यात पुन्हा एकदा बुलेट गाड्यांच्या फटाका सायलेन्सर वाजवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चार तरुणांवर विश्रांतवाडी पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. तसेच चार बुलेट जप्त केल्या आहेत.

आशिष अशोक शिंदे, (वय 29, रा. निळोकरनगर, लोणावळा), गुरुप्रसाद कर्नसिंग कंविस, (वय 29, रा. निळोकरनगर, लोणावळा), संजय मुन्सरत सुरवसे, (वय 20, रा. भीमनगर, वाघोली), गौरव लक्ष्मण मरगळे, (वय 20, रा. मस्केवस्ती, विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या तरुणांची नावे आहेत. आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 281, 292 आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 181(1), 199(5), 198, 197 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील 4 बुलेट गाड्या जप्त केल्या आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 4,14,000 रुपये आहे.

31 जुलै 2026 च्या रात्री 2 ते 2:30 च्या सुमारास वाघोलीतील सोलस्टिसी सोसायटी परिसरात रात्रीच्या वेळी काही तरुण आपल्या बुलेट गाड्यांना ‘फटाका सायलेन्सर’ लावून भरधाव वेगाने गाड्या चालवत होते. यामुळे मोठा आवाज होऊन परिसरातील नागरिकांच्या झोपमोड होत होती. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिसर-4 हितेश राजनिकर, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग सुनील जैतपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक संतोष राजपूत, अमर कदम यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.