मुंबई- खामगाव (तालुका दौंड) येथील वैशाली नागवडे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. माजी महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर सदर पद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होते.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्या म्हणून वैशाली नागवडे यांची ओळख आहे. त्यांचे संघटन कौशल्य विचारात घेऊन अजित पवार आईनी यापूर्वी ‘महानंद’ दूधच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे वैशाली नागवडे नेहमी राजकीय वर्तुळात चर्चेमध्ये राहिल्या. वैशाली नागवडे यांच्या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे.
वैशाली नागवडे यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीच्या महिला आघाडीचे नेतृत्व अधिक बळकट होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
