मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने केलेल्या गुंगी गुडिया या शब्दावरून राज्याच्या राजकारणामध्ये चांगलाच गदारोळ माजला आहे. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र या टीकेवर सुनेत्रा पवार यांनी मात्र अत्यंत मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसने वापरलेला गुंगी गुडिया हा शब्द अत्यंत चुकीचा आणि अपमानास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. या टीकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील या टीकेवर संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसने माफी मागावी अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली आहे. सुनील तटकरे म्हणाले, ” राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या अधिकृत एक्स खात्यावरून करण्यात आलेली पोस्ट ही त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शन आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात मतभेद असू शकतात, राजकीय संघर्षही असू शकतो; परंतु महिलांचा अवमान करणारी, वैयक्तिक पातळीवर घसरलेली भाषा कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही ” महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही सुसंस्कृत संवादाची आहे, व्यक्तीचा अपमान करण्याची नाही, असं सुनील तटकरे यांनी सुनावलं आहे. काँग्रेसने या पोस्टबद्दल महाराष्ट्रातील महिलांची आणि सुनेत्रावहिनी पवार यांची जाहीर माफी मागावी. मतभेद लोकशाहीचा भाग आहेत; मात्र महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सुनील तटकरे यांनी दिला आहे.
“उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसने केलेल्या अपमानास्पद भाषेचा आम्ही तीव्र निषेध करतो. शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान कधीही स्वीकारला जाणार नाही.” अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
ज्यांच्यावर गुंगी गुडिया अशी टीका करण्यात आली त्या सुनेत्रा पवार यांनी मात्र अत्यंत मोजक्या शब्दात आपली भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या ” मी वेळ आल्यानंतर उत्तर देईन”
