संवर्धनानंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले ! दर्शनासाठी भाविकांची गर्दी
रांजणगाव – अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे केलेल्या जतन व संवर्धनाच्या कामांनंतर शनिवार (दि.१) रोजी पहाटे मंदिर पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.
मंदिरातील जतन व संवर्धनाच्या कामासाठी १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. नियोजित कामे पूर्ण झाल्यानंतर दि. १ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले.
पहाटे ५ वाजता देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर-पाटील आणि चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर-पाटील यांच्या हस्ते श्री महागणपतींचा अभिषेक करण्यात आला.
त्यांच्या हस्ते १००१ नारळांचे तोरण श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले. सकाळी ७.३० ते १० या वेळेत देवस्थान ट्रस्टचे खजिनदार . विजय देव यांच्या हस्ते गणेशयाग विधी संपन्न झाला. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनरांग व्यवस्थेची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे भाविकांना सुरळीत व शिस्तबद्ध दर्शन घेता आले.
दुपारी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्याचा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर आणि गाभाऱ्याला विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजावट केली होती. नव्याने संवर्धित मंदिराचे भव्य आणि नयनरम्य रूप पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले.
