ब्रेकिंग न्यूज

अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय महामेळावा संपन्न

Share

पुणे : अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भव्य वधू-वर व पालक परिचय महामेळावा २०२६ हा कार्यक्रम रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महामेळाव्यास महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून समाजबांधव, पालक, युवक-युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ,श्री विश्वकर्मा सुतार समाज मेडिकल असोसिएशन,विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य व संलग्न संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.हा महामेळावा दिवंगत ज्ञानेश्वर (भाऊ) भालेराव यांच्या समाजकार्याच्या विचारांना समर्पित करण्यात आला. त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

महामेळाव्याचे मार्गदर्शन समन्वय समिती मुख्य प्रशासक तथा राज्य समन्वयक विद्यानंद मानकर सर यांनी केले.यावेळी बोलताना ते म्हणाले,
“समाजातील विवाह विषयक अडचणी दूर करून तरुण पिढीला विश्वास, पारदर्शकता आणि सन्मानाने नातेसंबंध जोडण्याची संधी मिळावी, हाच या महामेळाव्याचा खरा उद्देश आहे. समाज एकत्र आला तर कोणतीही अडचण अशक्य राहत नाही.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ मान्यवर श्री पी जी (भाऊ) सुतार धुळे होते. उद्घाटन श्रीमती प्रतिभाताई भालेराव व प्रदेशाध्यक्ष श्री दत्तात्रय सुतार यांनी केले. प्रमुख उपस्थितीमध्ये समाजातील विविध पदाधिकारी, संघटनांचे अध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते, तसेच शिक्षण, आरोग्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदविला.

महामेळाव्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे समाजहित लक्षात घेऊन फक्त १ रुपयात वधू-वर नाव नोंदणी, तसेच फक्त १९ रुपयांत संपूर्ण महाराष्ट्राची वधू-वर सूची (पुस्तिका) उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय इच्छुक समाजबांधवांसाठी फक्त ५१ रुपयांत सामुदायिक विवाह करण्याचा संकल्प महासंघाच्या वतीने करण्यात आला, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या महामेळाव्यात वधू-वर व पालकांना थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने अनेक स्थळे निश्चित होण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले. समाजातील विवाह विषयक अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, संलग्न संस्थांचे प्रतिनिधी, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

हा महामेळावा समाजासाठी दिशादर्शक, प्रेरणादायी व एकोप्याचा संदेश देणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर कदम व ग्रंथमित्र रमेशराव सुतार यांनी तर समारोपप्रसंगी आयोजकांच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भागवत यांनी उपस्थित सर्व समाजबांधव, मान्यवर व सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे मनापासून आभार मानण्यात आले.