ब्रेकिंग न्यूज

साहित्य निर्मितीची प्रेरणा शाळेतूनच कादंबरीकार विश्वास पाटील

Share

 

भोसरी वेध न्यूज – साहित्याची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शाळेत असतानाच गुरुजनांमुळे झाली. मराठी साहित्यात विपुल लेखन करत असतानाच माझी लेखणी शिवरायांच्या पावला जवळ येऊन थांबली आणि निर्माण झाली महाकादंबरींची मालिका. मराठी साहित्य टिकवायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भोसरी येथे केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखा, श्रीराम विद्या मंदिर, भोजापुर साहित्य कला संस्कृती मंडळ, लायन्स क्लब ऑफ भोजापुर गोल्ड या संस्थांच्या वतीने ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांचा नागरी सन्मान भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात .मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना पाटील बोलत होते.
शिवरायांच्या मावळ्याची पगडी आणि सन्मानचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते.

मिलिंद जोशी यांनी आपल्या मनोगतात मोबाईल मध्ये रमलेल्या आजच्या पिढीला वाचनाकडे वळवण्यासाठी दर्जेदार साहित्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लावण्यासाठी शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. शालेय संमेलनातच मुलांच्या साहित्य कलागुणांना वाव मिळतो. अशी भूमिका व्यक्त केली.

महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे यांनी प्रास्ताविकामध्ये शाखेच्या साहित्यिक वाटचालीचा घोषवारा व्यक्त केला . भोसरी शाखा विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले .

यावेळी त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  शंकर आप्पा गुळवे,उद्योजक मुकुंद आवटे उद्योजक सुदाम भोरे,डॉक्टर रोहिदास आल्हाट,साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले , श्रीराम विद्या मंदिर चे अध्यक्ष लालासाहेब जगदाळे सर, मुख्याध्यापिका संगीता हुंबे, सुनीता भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीराम विद्यामंदिर येथील माजी विद्यार्थी संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच कवयित्री संजना मगर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले.शंकर आप्पा गुळवे यांनी आभार मानले.श्रीराम विद्या मंदिर भोसरी यांनी संयोजन केले.