भोसरी प्रतिनिधी :-वादळी पावसात विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या वायरमन तुकाराम कांबळे यांच्या मृत्यूला जबाबदार ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची भमिका कुटुंबीयांनी घेतली आहे .
दोन दिवसापूर्वी वादळी पावसात विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे वायरमन कांबळे हे मोशी परिसरातील गंधर्व नगरी परिसरात विद्युत खांबावर विद्युत पुरवठा सुरळीत करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला. त्यात ते वरून खाली कोसळून पडले.
त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना आज शनिवारी पहाटे त्यांचे दुःखद निधन झाले.
कांबळे हे महावितरण मधील ठेकेदार याच्याकडे सुमारे 20 वर्षांपासून काम करत होते.
ठेकेदाराने अपघात घडल्यानंतर कोणतीही मदत केली नाही. अथवा रुग्णालयात झालेल्या खर्चाला देखील हातभार लावला नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याचे कांबळे यांच्या नातेवाईकानी सांगितले.
कांबळे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाकीची आहे. मुलगा व मुलगी शालेय शिक्षण घेत आहेत.
महावितरण आणि ठेकेदार यांच्यापैकी कोणीच मदत केली नाही तर कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषांच निधन झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.
मोशी प्राधिकरण परिसरातील काही नागरिकांनी आर्थिक मदतीचा हातभार लावला परंतु तो पुरेसा नाही.
स्थानिक लोकप्रतिनिधी विलास मडिगेरी यांनी मुजोर ठेकेदारावर कारवाई करुन कांबळे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली.
तुकाराम कांबळे हे मोशी प्राधिकरण परिसरातील सेक्टर चार सहा नऊ ११ आणि १३ या परिसरात विद्युत पुरवठा नियमित सुरु राहण्यासाठी कायम तत्पर
होते.
नम्र आणि विनयशील स्वभावाच्या कांबळे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
