पिंपरी (वेध न्यूज )मनोज जरांगे पाटील यांनी मराठा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला एकत्रित करून समाजाच्या मागण्या सरकार कडून मान्य करण्यासाठी जे प्रचंड आंदोलन उभे केले आहे ते मराठा मोर्चाच्या वतीने निवडणुका लढवून निस्तेज करू नये’ अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मराठा सेवा संघाचे पिंपरी – चिंचवड शहराचे मार्गदर्शक ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी पत्राद्वारे केली आहे .
कोणत्याही आंदोलनाला राजकीय वळण लागले की ते संपण्यास वेळ लागत नाही. जरांगे पाटील यांनी वेळोवेळी समाजाला सांगितले होते की , आम्ही निवडणुकीच्या राजकारणात पडणार नाहीत व जे सरकार अथवा राजकारणी मराठा समाजाच्या मागण्याला विरोध करेल अथवा अमान्य करेल त्याला धडा शिकवू व ते त्यांनी लोकसभेच्या निवडणुकी मध्ये मराठा समाजाची ताकद दाखवून दिली आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत प्रत्यक्ष भाग न घेता समाजाच्या विरोधात असणाऱ्या लोकांना त्यांच्या इशाऱ्या बरोबरच धडा शिकविला जाईल. कुणाला निवडून आणण्या पेक्षा समाजाच्या मागण्या कडे दुर्लक्ष अथवा विरोध करणाऱ्यांना पाडण्यातच आंदोलनाचे मोठे यश आहे व समाजही एकसंध राहील व आंदोलन दिर्घकाळ चालेल याची नोंद मनोज जरांगे पाटील यांनी घ्यावी असे ॲड.रानवडे यांनी त्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
जरी समाजातील विविध पक्ष व्यक्ती संघटना या निवडणुक लढविण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे नेते मा. मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रचंड दबाव आणत आहे. याची मराठा समाजातील लोकांना पूर्णपणे जाणीव आहे व मनोज जरांगे पाटील यांनी जीव पणाला लावून आतापर्यंत आलेल्या संकटाना व दबावाला खंबीर पणे तोंड दिले आहे .
तसेच या महत्वाच्या वेळी त्यांनी दबावाला झुगारून दयावे अशी समाजाची त्यांच्या कडून अपेक्षा आहे आणि जरी काही थोड्या ठिकाणी त्यांना माघार घ्यावी लागली तरी समाजाच्या त्यांच्या प्रामाणिक पणावर पूर्ण विश्वास आहे. व ते देतील तो आदेश पाळेल .अशी अपेक्षा ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी व्यक्त केली .

