ब्रेकिंग न्यूज

औंध-बोपोडीत रंगले बाल-कलाकारांचे विश्व; स्वच्छतेचा संदेश देत सनीदादा निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न

Share

बोपोडी (पुणे) : नगरसेवक सनीदादा निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त बोपोडी परिसरात ‘औंध-बोपोडी प्रभाग – स्वच्छ पुणे’ या थीमनुसार भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘महापुरुषांना स्वच्छांजली’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा घेण्यात आली असून, तब्बल ५८५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसर रंगमय करून टाकला.

लहानग्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता, पर्यावरण, महापुरुषांचे विचार, आपला परिसर आणि आपली शाळा अशा विविध विषयांवर कल्पक चित्रे साकारली. हातात रंग आणि कुंचले घेऊन कागदावर उतरवलेल्या त्यांच्या कल्पनाशक्तीने उपस्थितांची मने जिंकली. मोठ्या संख्येने झालेल्या सहभागामुळे स्पर्धास्थळी आनंदी, चैतन्यमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते. सदर स्पर्धा अमित मुरकुटे यांच्या विशेष प्रयत्नांतून यशस्वीपणे पार पडली.

यावेळी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळालेली ही दाद पाहून खूप आनंद झाला. मुलांमधील कलाकार घडवण्यासाठी अशा व्यासपीठाची गरज असते. विद्यार्थ्यांनी आपले घर, शाळा आणि परिसर स्वच्छ राहावा ही भावना मनात रुजावी आणि त्यांच्या सहभागातून स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे मनःपूर्वक आभार.”

या उपक्रमामुळे औंध-बोपोडी परिसरात सामाजिक जाणीव आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.