पिंपरी-आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या सर्व उमेदवारांनी आज पक्षाशी, मतदारांशी आणि स्वच्छ राजकारणाशी एकनिष्ठ राहण्याची अधिकृत शपथ घेतली. हा शपथविधी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी उपस्थित सर्व उमेदवारांनी कधीही पक्ष न सोडण्याचा, जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्याचा तसेच कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचार, लाचलुचपत व गैरव्यवहारापासून दूर राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
विशेष बाब म्हणजे शहराध्यक्ष रविराज काळे यांनीही स्वतः एक उमेदवार म्हणून या शपथेत सहभाग घेतला आणि “राजकारणात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी ही केवळ घोषणा नसून ती आम आदमी पार्टीची ओळख आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, आम आदमी पार्टीचे सर्व उमेदवार हे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर जनतेची सेवा करण्यासाठी मैदानात उतरले असून, प्रत्येक प्रतिनिधी जनतेसमोर उत्तरदायी राहील.
या शपथविधीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने शहरात स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख राजकारणाचा संदेश पुन्हा एकदा ठामपणे दिला आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक उमेदवार प्रभागातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहील आणि विकास, पारदर्शक प्रशासन व सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
